Join us
Daily Top 2Weekly Top 5

पर्सनल लोनपेक्षा गोल्ड लोन स्वस्त! १ लाखाच्या कर्जावर किती बसेल हप्ता? जाणून घ्या सोपे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:58 IST

Gold Loan : आजकाल सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्य लोक सोने खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. बँका सोन्यावर किती कर्ज देतात? तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल? तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल? चला जाणून घेऊया.

Gold Loan : सध्या सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे नवीन सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. मात्र, अशा काळात तुमच्याकडे असलेले जुने सोने 'संकटसमयीचा मित्र' ठरू शकते. अनपेक्षित वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण किंवा व्यवसायासाठी पैशांची नड भासल्यास, सोने विकण्याऐवजी त्यावर कर्ज घेणे हा एक उत्तम आर्थिक पर्याय आहे. वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत गोल्ड लोन स्वस्त आणि जलद मिळते.

किती कर्ज मिळू शकते?तुम्ही बँकेत सोने जमा केल्यावर त्याच्या बाजारमूल्याच्या किती टक्के कर्ज मिळेल, हे रिझर्व्ह बँकेच्या 'लोन टू व्हॅल्यू' (LTV) नियमावर अवलंबून असते.२.५ लाखांपर्यंत कर्ज : सोन्याच्या मूल्याच्या ८५% पर्यंत रक्कम मिळू शकते.२.५ ते ५ लाखांपर्यंत : सुमारे ८०% पर्यंत कर्ज मिळते.५ लाखांच्या वर : मूल्याच्या ७५% पर्यंत कर्ज दिले जाते.उदाहरण : जर तुमच्याकडे १० ग्रॅम (२२ कॅरेट) सोने आहे आणि त्याची आजची किंमत १.४० लाख रुपये आहे, तर तुम्हाला साधारणपणे १.१९ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

व्याजदराची तुलना : बँका की NBFC?

  • गोल्ड लोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचा कमी व्याजदर. प्रमुख बँकांचे दर साधारणपणे ८.५% ते १२% दरम्यान असतात.
  • एसबीआय : व्याजदर ८.७०% पासून सुरू होतात.
  • एचडीएफसी/आयसीआयसीआय : ८.५% ते ११%.
  • एनबीएफसी (मुथूट, मणप्पुरम इ.) : ९.५% ते १८% पर्यंत व्याज आकारू शकतात.

परतफेडीचे लवचिक पर्याय

  • मासिक ईएमआय : तुम्ही मुद्दल आणि व्याज दरमहा हप्त्याने फेडू शकता.
  • केवळ व्याज : दरमहा फक्त व्याजाचा भरणा करायचा आणि शेवटी मुद्दल द्यायचे.
  • बुलेट पेमेंट : १ लाख रुपयांच्या आतील कर्जासाठी वर्षअखेरीस व्याज आणि मुद्दल एकत्र भरण्याची सोय काही बँका देतात.
  • ओव्हरड्राफ्ट सुविधा : गरजेनुसार पैसे काढण्याची आणि भरण्याची सोय.

वाचा - ९० वर्षांच्या आजोबांना विकली चक्क ९९ वर्षांनी मॅच्युअर होणारी पॉलिसी; नागपूरमधील घटनेने खळबळ

कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • बँक फक्त सोन्याचे वजन आणि शुद्धता (कॅरेट) तपासेल. दागिन्यांमध्ये खडे, मोती किंवा इतर धातू असतील, तर त्यांचे वजन वजा केले जाते.
  • १ लाखाचे कर्ज ८.७% दराने १२ महिन्यांसाठी घेतल्यास महिना EMI अंदाजे ७,००० रुपये येतो. फक्त व्याज भरायचे झाल्यास दरमहा सुमारे ८५० रुपये लागतील.
  • जर तुम्ही वेळेवर कर्ज फेडले नाही, तर बँक तुमचे सोने लिलावात काढू शकते. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसारच कर्ज घ्यावे.
  • कर्ज घेताना बँक काही प्रमाणात प्रक्रिया शुल्क आकारते.
टॅग्स :सोनंबँकिंग क्षेत्रबँक